गडचिरोलीच्या हत्तींना मिळाली 12 दिवसांची हक्काची सुट्टी, कॅम्प राहणार बंद – News18 मराठी

गडचिरोली,03 फेब्रुवारी : सध्या एक-दोन दिवसांची सुट्टी मिळवतानाही नोकरदार लोकांना भरपूर आटापिटा करावा लागतो. पण, गडचिरोलीतील हत्तींना मात्र एक-दोन नव्हे तर 12 दिवसांची सुट्टी मिळाली आहे. त्यामुळे सुट्टीसाठी आस लावून बसलेल्यांना हत्ती किती भाग्यवान आहेत असं कदाचित वाटू शकतं. पाहुया हत्तींना 12 दिवसांची हक्काची सुट्टी मिळते म्हणजे नेमकं काय होतं.

गडचिरोली वनवृत्त सिरोंचा वन विभागाअंतर्गत कमलापूर वनपरिक्षेत्रमध्ये कार्यरत असलेले अजित, मंगला, बसंती, रुपा, राणी, प्रियांका, गणेश, लक्ष्मी अशा आठ हत्तींचे “चोपिंग” असल्याने त्यांना हक्काच्या सुट्टीवर पाठवले जात आहे.

वाढत्या थंडीमुळे हत्तीच्या तळपायाला भेगा पडतात. चालताना त्यांना त्याचा त्रास होतो. त्या भेगांवर आणि दुखऱ्या पायांवर उपचारासाठी त्यांना वैद्यकीय सुट्टी देण्यात आली आहे. अशी सुट्टी त्यांना दरवर्षीच देण्यात येते. या दहा दिवसात त्यांच्या पायांना “चोपिंग” औषधांचा शेक दिला जातो. 40-45 प्रकारच्या जडीबुटींपासून औषध तयार केले जाते. त्यासाठी हिरडा, बेहडा, सुंठ, त्रिफळा, जायफळ, आसमंतारा अशा वेगवेगळ्या वनस्पतींचा वापर करून एका ड्रममध्ये उकळवून “चोपिंग” चा लेप तयार करतात.

मनोज जरांगे पाटलांसोबत आता 24 तास 2 पोलीस असणार! कारण आलं समोर

त्याद्वारे महावत, चाराकटर पहाटेच्या वेळी हत्तीचे पाय शेकतात. महाराष्ट्रात एकमेव असल्यानं येथे हत्ती बघण्यासाठी कमलापूर हत्ती कॅम्पला अनेक पर्यटक येत असतात. नक्षलग्रस्त भागात असूनही पर्यटकांच्या आवडीचे ते ठिकाण आहे. येथील हत्तींनी पर्यटकांना लळा लावला आहे. शासनाने मात्र अजूनही या हत्ती कॅम्पला गंभीरपणे घेतलेले नाही. येथील पदभरती रखडली आहे. माहूत आणि चाराकटर या पदांची संख्या कमी असूनही त्यांनी पोटच्या मुलांप्रमाणे या हत्तींना जपले आहे आणि जपत आहेत. मात्र, सध्या हा कॅम्प बारा दिवसासाठी बंद आहे. कारण हत्ती सध्या सुट्टीवर आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18Marathi वर.
आजच्या ताज्या बातम्या, सर्व लाइव्ह न्यूज अपडेट्स, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 मराठीवर.

Source link

news portal development company in india